‘एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षापर्यंत जायला नको होतं’; बच्चू कडूंचं मोठं विधान

मुंबई/प्रतिनिधी

एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटातील वाद शिगेला गेला आणि शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदासाठी बंड केलं, अशीही चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर होत असते. शिवसेनेत झालेल्या फुटीवर बोलताना बच्चू कडूंनी मोठं विधान केलंय. त्यामुळे शिंदेंचं बंड खरंच मुख्यमंत्रीपदासाठी होतं का? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.

एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी बंड केलं. त्यानंतर शिवसेनेवरच शिंदे गटाने दावा ठोकला. या राजकीय घटनेवर आमदार बच्चू कडू ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना भाष्य केलं. ‘गेल्या शंभर दीडशे दिवसात शिवसेनेत जे झालं, त्याबद्दल तुमची काय भावना आहे?’, असा प्रश्न बच्चू कडूंना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, “वाईट आहे. एखादं संघटन एव्हढं कोसळतं, त्याचं वाईट वाटतं. मी जरी एकनाथ शिंदेंसोबत असलो, तरी मला मनात असं वाटतं होतं की, मुख्यमंत्र्यापर्यंत (मुख्यमंत्री पदापर्यंत) ही लढाई ठीक होती. त्या पक्षापर्यंत जायला नको होतं, असं मला वाटतं. कुठल्याही संघटनेचं इतकं पतन होणं फार काही चांगलं नाहीये.”

पतन या शब्दाबद्दलही बच्चू कडूंनी लागलीच खुलासा केला. ते म्हणाले, “पतन हा शब्द नकळत निघाला असेल. असं वाटतं की जे नुकसान झालं. म्हणजे ४० आमदार पक्षातून जाणं ही लहान गोष्ट नाहीये. ते त्यांना पुन्हा उभं करणं, याचं दुःख त्यांना आहे. ते कोणत्या कारणास्तव गेले, हे एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. तो एक वेगळा भाग आहे. पण कुठल्याही पक्षाच… उद्या २०-२५ आमदार शिंदेंचे गेले, तर त्यांनाही दुःख होणारच आहे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.