मुंबई/प्रतिनिधी
राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेच्या पन्नास बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात भाजप बरोबर सरकार स्थापन केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.
त्यानंतर अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आमदारांच्या मतदार संघातून शिवसंवाद यात्रा सुरु केली.त्याला देखील प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.आता आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवानंतर त्यांच्या ‘महाप्रबोधन’ यात्रेची सुरुवात हि ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील जाहीर सभेने करणार असून यात्रेचा शेवट हा कोल्हापुरातील बिंदू चौकात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री ठाकरे हे त्यांच्या जाहीर सभांमधून बंडखोर आमदारांविषयी नेमकं काय बोलणार हे पहावं लागेल.