पुणे/ प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन केले.मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत त्यांचा निधी रोखला आहे.त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील वढू आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासाचा देखील निधी रोखल्याच्या आरोपावरून संभाजी ब्रिगेडने आता मुख्यमंत्र्यांवर आता निशाणा साधला आहे.
“महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याच्या नादात, वढु व तुळापुरचा विकास निधी देखील रोखला…वा धर्मवीर शिंदे…नवरा मेला तरी चालेल सवत बोडकी झाली पाहिजे..” असं संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटल आहे.
दरम्यान,कालच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत.महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नका अशी मागणी केली आहे.