मुंबई/प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आल्याचं कारण देत त्यांनी हा दौरा स्थगित केला आहे. या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यामुळेच दौरा रद्द केल्याच्याही चर्चा सातत्याने होत आहेत. दरम्यान, हा दौरा स्थगित होऊनही बृजभूषण शांत बसलेले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
देवरिया इथल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन. राज ठाकरेंचं आता हृदय परिवर्तन झालंय आणि त्यांना अयोध्येला यायचं आहे. पण उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आम्ही सगळेच रामाचे वंशज आहोत आणि त्यांनाच राज यानी अपमानित केलं आहे, मारलं आहे. त्यामुळे जेव्हा ते माफी मागतील, तेव्हाच येऊ शकतील.
बृजभूषण सिंह पुढे म्हणाले की, राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, पण नंतर त्यांनी आपला दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतरही बृजभूषण सातत्याने राज ठाकरेंना विरोध करत आहेत.