राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !

मुंबई/प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

“मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि पोलीस आयुक्तांना भेटलो,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं.

“अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली होती. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत असं त्यांनी सांगितलं होतं.

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published.