औरंगाबाद/प्रतिनिधी
मशिदींवर भोंगे वाजले तर दुप्पट आवाजात तेथे हनुमान चालिसा लावा असे आदेश राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत दिले होते. तसेच आपण मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
त्यामुळे राज्यभरात व मराठवाड्यातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठवाड्यात अजान झाली, मात्र तिचा आवाज कमी होता व कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अन्य शहरांप्रमाणे मराठवाड्याच्या नांदेड या प्रमुख शहरातही कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. येथेही पहाटेची अजान शांततेत झाली. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना अगोदरच नोटीसा बजावल्या होत्या. त्यामुळे शहरातले सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते.
उस्मानाबाद आणि परभणीतही नोटीसा आणि धरपकड झाली होती. त्यामुळे राज यांनी दिलेल्या इशाऱ्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. बीडमध्ये भोंगा न लावताच अजान देण्यात आली तर मनसेकडूनही लाऊड स्पीकर न लावता हनुमान चालीसा म्हणण्यात आली. परस्परांचे सत्कारही करण्यात आले. एकप्रकारे येथे सौहार्दाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.