पुणे/प्रतिनिधी
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी तळेगाव आणि चाकण येथील आद्योगिक समस्यांबाबत आढावा बैठक घेतली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना सामंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, बारा आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पाडण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
त्याचसोबत शिंदे गटातील आमदारांच्या नाराजी विषयी त्यांना विचारले असता बाळासाहेबांच्या शिवसेनेतील (शिंदे गट) मंत्री वा आमदार नाराज असल्याचा त्यांनी इन्कार केला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत वाद असल्याची अफवा आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज तळेगाव आणि चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत बैठकीत आढावा घेतला.आणि उद्योगांना होणार सर्व प्रकारचा त्रास मुळासकट उखडून टाकण्याची मोहीम सुरु केली असल्याची देखील माहिती दिली.