‘आता राऊतांनीच जरा शांततेची भूमिका घ्यावी’ – दीपाली सय्यद

मुंबई /प्रतिनिधी

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही. त्यामुळे शिवसैनिक संभ्रमात आहेत. तसेच शिवसेनेतून दररोज नवीन नेत्याची किंवा पदाधिकाऱ्यांची नारळ देऊन बोळवण सुरु आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे भविष्य काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. त्यात शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठं वक्तव्य केलं.

दीपाली सय्यद यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट टाकली. येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे यांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव ठाकरे मोठ्या मनाने कुटूंबप्रमुखाची भुमिका निभावत आहेत. या मध्यस्थीकरीता भाजप नेत्यांनी मदत केली. त्यांचे पण आभार. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल, असे त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या.

त्यावर संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत त्यांना झापले होते. दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. शिवसेनेच्या नेत्या आहेत. त्या कोणत्याही पदाधिकारी नाहीत. त्यांना कोणते अधिकार आहेत? त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. त्यांनी कोणाशी चर्चा केली याबद्द्ल मला माहित नाही, असे राऊत म्हणाले. राऊतांच्या या प्रतिक्रियेनंतर सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सारवासारव केली.शिवसेनेतील दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे.

त्यातून मी या आशयाचे ट्विट केले होते. शिवसेना एक कुटूंब आहे आणि ते तुटू नये असे मला वाटते, असा खुलासा सय्यद यांनी केला. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शांततेची भूमिका घेऊन यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला देखील त्यांनी राऊतांना दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.