मुंबई/प्रतिनिधी
कोरोना आणि त्यानंतरच्या संपामुळे एसटीची सेवा जवळपास तीन वर्षे रखडली होती. गेल्या २२ एप्रिलपासून एसटीची राज्यभरातील सेवा पूर्वपदावर येत असताना मात्र अनेक आगारांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांची मुंबई सेंट्रल आगारात गर्दी वाढली आहे; मात्र एकच तिकीट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
पाच महिन्यांच्या संपानंतर पूर्वपदावर आलेल्या एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक मार्गांवरील प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. गैरसोय टाळण्यासाठी अनेक जण आगाऊ आरक्षणास प्राधान्य देतात; मात्र एसटीच्या मुख्यालयातच असलेल्या मुंबई सेंट्रल आगारात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीबाबत कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने आगार प्रशासनाकडून आरक्षण खिडक्यांची संख्या वाढवणे अपेक्षित होते; मात्र एकच खिडकी सुरू असल्याने प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. शिवाय महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी नसल्याने त्यांना तिकिटासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आम्ही आगाऊ आरक्षणाला प्राधान्य देतो; मात्र एकच तिकीट खिडकी सुरू असल्याने दीड तास रांगेत उभे राहावे लागले. एसटी प्रशासनाने तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी स्वतंत्र खिडकी देण्यात आली आहे. आरक्षित तिकिटांसाठी दोन शिफ्टमध्ये एक खिडकी सुरू आहे. प्रवाशांची गर्दी पाहून दुसरी खिडकी सुरू करण्यात येणार आहे.