मुंबई/प्रतिनिधी
राज्यात आरोग्य विभागात लवकरच 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. येत्या 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान जाहिरात निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
याबाबत महाजन म्हणाले की, मार्च २०१८ मध्ये आरोग्य विभागात १३ हजार जागांची भरती निघाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं. आता आम्ही १० हजार १२७ जागा भरणार आहोत. त्यासाठीचं वेळापत्रक निश्चित केले आहे.
फेब्रुवारी-मार्च दरम्यान आम्ही या परीक्षा घेणार आहोत. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्तीपत्रक देणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं. ते पुढं म्हणाले की, १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. तर २५ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदावारांची यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर २५ ते २६ मार्च दरम्यान परीक्षा होतील.
दरम्यान २७ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत निकाल जाहीर करून उमेदवारांची नियुक्ती आम्ही करणार आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.