शरद पवार खोटं बोलतायत; पवारांच्या बैठकीतील ‘त्या’ वक्तव्यावरून ब्राम्हण महासंघाचा मोठा दावा

पुणे/प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्राह्मणांना आरक्षण हवे हा मुद्दाच निघालेला नाही. पवार यासंदर्भात जे सांगतायेत ते खोटं असल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. शनिवारी सायंकाळी राज्यातील १२ ब्राम्हण संघटनांच्या ४० प्रतिनिधींची पवार यांच्या समवेत पुण्यामध्ये बैठक झाली होती.

स्वत: पवार यांनीच या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना काही प्रतिनिधींनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती असे सांगितले होते. हे शक्य नाही असे सांगताना आपल्याकडील काही आकडेवारीची माहिती त्यांना दिली. त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये या समाजाची संख्या जास्त दिसते. त्यामुळे आरक्षण मिळणे शक्य नाही, मात्र ग्रामीण भागातून शहरांमध्ये येणाऱ्या ब्राह्मण समाजातील युवकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची बैठक करून देण्याचे आश्वासन त्यांना दिले असे पवार यांनीच बैठकीत सांगितले.

आता यावरच गोविंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, आरक्षणाचा विषयच बैठकीत झालेला नाही. यासंबधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कोणालाच आरक्षण नको अशी काहीजणांची भूमिका होती, मात्र पवार यांनी त्याचे खंडन करताना दलित, आदिवासी तसेच मागास समाजाला त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण असायला हवे अशी भूमिका व्यक्त केली. ब्राह्मण समाजाचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही, घटनेने दिलेले आरक्षण समाजाला मान्यच आहे. त्या बैठकीत ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे असा मुद्दा कोणीच मांडलेला नाही असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. बैठकीला उपस्थित अन्य ५ संघटनांनीही असा खुलासा केला असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला असल्याचे स्पष्ट केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.