बारामती/प्रतिनिधी
एका दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा सांयकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.आचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची आणि कामानिमित्त घरा बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये परतीच्या पावसाने पुण्यासह जिल्ह्यातील काही भागांना चांगलेच झोडपून काढले.बारामती देखील गेल्या एक ते दीड तासांपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसत होता परिणामी शहरातील काही सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले होते.त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
दरम्यान,सतत होणाऱ्या पावसामुळे नाझरे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून नाझरे धरणाच्या स्वयंचलित दरवाजांद्वारे कऱ्हा नदी पात्रात ११७० क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून पुढील पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग कमी जास्त होऊ शकतो.तरी कऱ्हा नदी काठच्या नागरिकांनी नदी पात्रात न जात सतर्क राहावे असे आवाहन नाझरे धरण शाखा अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.