मुंबईतील अनोख्या लग्नाची गोष्ट! नवविवाहित दाम्पत्याकडून लग्नात आलेल्या पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप

मुंबई/मंगेश भालेराव

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे लग्नातील मोठ्या खर्चाला फाटा देत महापुरूषांची पुस्तके वाटप करुन मुंबईतील मयूर देठे आणि नेरिन ट्रिंडॅड या नवविवाहित दाम्पत्याने समाजासमोर आदर्श ठेवलाय.

लग्न समारांभासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चाला फाटा देत मुंबईतील देठे परिवाराने आपल्या मुलाच्या लग्नात महापुरुषांच्या पुस्तकांचे लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना वाटप केले आहे. महापुरूषांचे विचार घराघरात रुजविणारा तसेच वाचन संस्कृती रुजविणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील कांदिवलीत शहरात राहणाऱ्या देठे आणि पोरवोरिम ,गोवा येथील ट्रिडॅड परिवाराचा विवाह सोहळा 17 डिसेंबर रोजी पार पडला. या विवाह समारंभात देठे कुटुंबाकडून पाहुण्यांना पुस्तके भेट देण्यात आली. छात्र भारती संघटनेचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी या स्तुत्य कृतीबद्दल नवविवाहीत जोडपं मयूर व नेरिन या दोघांचेही अभिनंदन केले आहे.

लग्नात आलेल्या सर्वांना का.गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातीव्यवस्थेचे निर्मुलन’ हे पुस्तक वाटप करण्यात आले. मुंबईमधील कर्तव्यदक्ष शहीद. पोलिस अधिकारी नंदकुमार देठे यांचा मुलगा यांचा मुलगा मयूर देठे आणि गोवा येथील नेरिन ट्रिंडॅड यांचा विवाह सोहळा शनिवार दि.१७ डिसेंबर रोजी मुंबई शहरातील अनमोल बँक्वेट्स सभागृहात पार पडला.

दरम्यान मयुर देठे आणि नेरिन ट्रिंडॅड यांनी १५ डिसेंबर रोजी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर त्यांचा बौद्ध आणि ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या जोडप्यांचं लव्ह मॅरेज असले तरी त्यांनी महापुरूषांची पुस्तके वाटप करुन या नवविवाहित दाम्पत्याने समाजासमोर आदर्श ठेवलाय. विवाह सोहळ्यात पुस्तके वाटपामुळे विचारांची देवाणघेवाण तर होईलच, शिवाय मोबाईलमुळे लोप पावत चाललेली वाचन संस्कृतीही रुजेल यात शंका नाही, अशा भावाना उपस्थित पाहुणे मंडळींनी व्यक्त केल्या आहेत.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published.